शेताच्या बांधावर गावरान कोंबड्या पाळल्याने 35 हजार रूपये महिना कमाई

Success Story: वडिल वैद्यकीय व्यवसाय सांभाळून घराच्या मागील मोकळ्या जागेत परसातील कुक्कुटपालन करायचे. कुणालने वडिलांच्या छोट्या व्यवसायाला मोठे स्वरुप दिले. शेताच्या बांधावर शेड बांधून तिथे मांसल कोंबडीपालनाची सुरुवात केली. आज गावरान कोंबड्यांचे व्यावसायिक दृष्टीकोनातून संगोपन करून तो सुमारे 35 हजार रूपये महिन्याची कमाई सहजपणे करत आहे.

Earning 35 thousand rupees per month by rearing Gavran chickens on the farm fence

जळगाव जिल्ह्यात तापी नदीच्या काठावर वसलेले डिकसाई हे जेमतेम 200 उंबऱ्यांचे खेडे. तापीच्या खोऱ्यातील सुपिक जमिनीत तेथील शेतकरी केळी, कापूस तसेच अन्य नगदी पिके घेतात. व्यवसायाने डाॅक्टर असणारे दिनेश चव्हाण त्यापैकीच एक. बीएएमएसची पदवी संपादन केल्यानंतर डॉक्टर चव्हाण यांनी डिकसाई शिवारातील शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून वडिलोपार्जित शेतीत सतत नवीन प्रयोग करण्याच्या बाबतीत ते ऊत्साही असायचे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या घराच्या मागील बाजुस देशी गावरान कोंबड्यांचे पालन त्यांनी सुरु केले आहे. कमी खर्चाचे 10 फूट रुंद आणि 20 फूट लांब आकाराचे जाळीचे शेड त्यासाठी उभारले आणि त्यात 75 देशी गावरान कोंबड्या ठेवल्या. स्थानिक वातावरणात वाढणाऱ्या तसेच शेतमजुरांकडे सहज उपलब्ध होणाऱ्या गावरान कोंबड्यांचे अंडी देण्याचे प्रमाण संकरीत कोंबड्यांच्या तुलनेत खुपच कमी असते. या अनुषंगाने कोंबड्यांवरील खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी डॉक्टरांनी नामी युक्ती शोधली. जवळपासच्या रेशन दुकानावर खाली पडल्याने वाया जाणारे गहू, तांदुळ जेमतेम 5 रुपये प्रति किलो दराने मिळतात. त्याचाच वापर कोंबड्यांचे खाद्य म्हणून करण्यावर त्यांनी भर दिला. हेच त्यांचे मॉडेल त्यांचा मुलगा कुणाल याने पुढे नेले आहे.

गावरान कोंबडीपालनाची अशी झाली सुरुवात

कुणालने वडिलांचा कुक्कुटपालन व्यवसाय नव्याने सुरु केल्यानंतर सुरुवातीला ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले. परंतु, खाद्यावरील खर्चाच्या तुलनेत कोंबड्या विकून मिळणारी आर्थिक कमाई खूपच कमी व्हायची. त्यामुळे त्याला काही दिवसातच ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन बंद करावे लागले. कालांतराने स्थानिक पातळीवर विकसित झालेल्या गावरान पक्ष्यांचे संगोपन करण्याचा निर्णय त्याने घेतला. जळगाव जिल्ह्यातच मिळणाऱ्या सातपुडा देशी जातीच्या गावरान सदृश कोंबड्यांची निवड त्यासाठी केली. एका दिवसाची पिल्ले आणून ती वाढविण्यास फार काही अडचण आली नाही. कारण, त्यांच्या शेडमध्ये पूर्वी ब्रॉयलर पक्षांचे संगोपन करण्याचा अनुभव होताच. सातपुडा देशी जातीचे पक्षी दोन महिन्यात सव्वा ते दीड किलोपर्यंत वजनाचे सहज होतात. त्यांच्या संगोपनावरील खर्चही ब्रॉयलरच्या तुलनेत खूपच कमी असतो. भावाचे म्हणाल तर सातपुडा देशी कोंबड्यांना बाजारात 130 ते 160 रूपये प्रति किलोचा दर कधी मिळतो. सातपुडा देशी कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते. त्यामुळे त्यांचा औषधींचा खर्च नगण्य असतो.

असे आहे गावरान पक्ष्यांचे नफ्याचे गणित

कुणाल चव्हाण हा तरूण प्रत्येकवेळी फक्त 1000 सातपुडा देशी जातीच्या गावरान कोंबड्यांची बॅच टाकतो. एक हजार पक्ष्यांमागे त्याला 12 क्विंटलपर्यंत जीवंत पक्ष्यांचे उत्पादन मिळते. बाजारात गावरान कोंबड्यांना सरासरी भाव 140 ते 150 रूपये मिळतो. एका दिवसाच्या पक्ष्यांची किंमत तसेच खाद्य व औषधींचा खर्च वजा जाता 30 ते 35 हजार कमाई त्याला महिनाअखेर मिळते. व्यापारी शेडवर येऊन कोंबड्या खरेदी करतात. याशिवाय शेतीला 15 ते 16 ट्रॉली कोंबडीखत उपलब्ध होते. त्याच्या वापरामुळे शेतीचा पोत सुधारून पीक जोमदार वाढते.

संपर्क ः कुणाल चव्हाण, मो. 93221 48487

WhatsApp Group
Previous articleअंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना आता दरवर्षी एक साडी मोफत मिळणार
Next articleराज्यात 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर ‘महारेशीम अभियान-2024’ राबविण्यात येणार