चोपडा तालुक्याचे एक्सपोर्ट क्वालिटी कलिंगड पोहोचले थेट ओमान देशात

Success Story : केळी, ऊस, कापसाच्या शेतीतून भरघोस उत्पादन घेण्यात चोपडा तालुक्याचे शेतकरी पूर्वापार प्रसिद्ध आहेत. आता कलिंगडासारख्या कमी कालावधीत हाती येणाऱ्या नगदी पिकाकडेही तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. गूळ नदीच्या काठावरील रूखणखेडा येथील प्रयोगशील युवा शेतकरी श्री.अजय पाटील हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या शेतातील बिगरमोसमी कलिंगड यंदा समुद्री मार्गाने थेट ओमान देशात निर्यात झाले आहेत. कलिंगडाने शेतकरी पाटील यांना 65 दिवसातच लखपती केले आहे.

अजय पाटील यांची रूखणखेडा शिवारात सुमारे 18 एकर बागायती शेती असून, तिथे त्यांनी दोन ट्यूबवेलच्या माध्यमातून ठिबक सिंचनाची सोय सुद्धा केली आहे. तसे पाहिले तर केळी आणि कांदा ही त्यांची मुख्य पिके आहेत, पण अलिकडील काही वर्षात त्यांनी कलिंगडाचे पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. साधारणपणे सन 2020 पासून कलिंगड शेतीकडे अजय पाटील हे वळले आहेत. रूखणखेडा गावालगतच्या माचला गावाचे प्रयोगशील शेतकरी व चोपडा येथील श्री ऍग्रोचे संचालक डॉ.रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलिंगड शेतीत नशीब आजमावले आहे. यंदाही सातव्यांदा अजय पाटील यांनी सुमारे 3 एकरावर कलिंगडाची लागवड केली होती.

कलिंगडाच्या फळांचे भरघोस उत्पादन

अजय पाटील हे साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात कलिंगडाची लागवड दरवर्षी करत असत. यावर्षी बिगरमोसमी हंगामातही त्यांनी कलिंगड लागवडीचा प्रयोग करून पाहिला. त्यानुसार त्यांनी नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 5 तारखेला गुजरात राज्यातील सिमोन्स सीड्सचे बाहुबली वाण वापरून कलिंगड लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घेतली. पाच फुटांवर बेड तयार करून त्यावर रासायनिक खतांचा बेसल डोस टाकून घेतला. पिकाच्या जोमदार वाढीसाठी बेडवर मल्चिंग पेपर देखील अंथरूण घेतला. पाच बाय सव्वा फूट अंतरावर बियाणे लागवड पूर्ण केली. वेळोवेळी ठिबकवाटे दर चौथ्या दिवशी विद्राव्य खते तसेच मुख्य व सूक्ष्म अन्नद्वव्ये कलिंगड पिकाला दिली. त्याचप्रमाणे करपा व भुरी यासारख्या रोगांवर नियंत्रणासाठी शिफारशीनुसार बुरशी नाशके पिकावर वेळोवेळी फवारली. मावा, फुलकीडे, पांढरी माशी, हिरवे तुडतुडे आटोक्यात आणण्यासाठी ठराविक अंतराने कीटकनाशकांच्या फवारण्या करून घेतल्या. शेतात ठिकठिकाणी कामगंध व चिकट साफळे बसवून घेतले. कलिंगड फळांचे भरघोस उत्पादन त्यामुळे त्यांना मिळाले.

65 दिवसातच कलिंगडाने बनविले पाटील यांना लखपती

अजय पाटील यांच्या शेतातीत कलिंगडाच्या फळांचा दर्जा उत्तम असल्याने जागेवर 14 रूपये 21 पैसे प्रतिकिलोचा भाव प्रसिद्ध व्यापारी आबा राजपूत यांच्याकडून मिळाला. पाटील यांना कलिंगडाचे प्रत्येकवर्षी उन्हाळी हंगामात चांगले उत्पादन मिळते. बिगरहंगामी मोसमातही त्यांना कलिंगडाचे यंदा अपेक्षित उत्पादन व भाव मिळाला आहे. कमी कालावधीत कमी खर्चात त्यांना कलिंगडाने लखपती केले आहे. त्यांना 3 एकरात 16 पाकिटे बियाणे सिमोन्स सीड्सचे लागले होते. लागवडीपासून काढणीपर्यंत सुमारे 1 लाख 30 हजार रूपये खर्च आला. मेहनत फळाला आल्याने ए ग्रेड दर्जाची 45 टनापर्यंत कलिंगडे त्यांना काढणीच्या वेळी मिळाली. त्यापासून साडेपाच ते सहा लाखापर्यंत आर्थिक कमाई सुद्धा झाली आणि खर्च वजा जाता सुमारे 4 लाख रूपये निव्वळ नफा मिळाला. त्यांच्या शेतातील संपूर्ण कलिंगड जहाजाद्वारे थेट ओमान देशात एक्सपोर्ट करण्यात आले आहे.

WhatsApp Group
Previous articleशासनाकडून तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलांच्या अनुदानात झाली भरीव वाढ
Next articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत शेतीची भरपाई देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही