शेतकऱ्याने मुलीच्या नावाने नावारूपास आणला लोणच्याचा ‘सृष्टी’ ब्रॅन्ड

Success Story : जळगाव जिल्ह्यातील कोळपिंप्री (ता.पारोळा) येथील सतीश निंबाजी काटे गेल्या यांच्याकडे जेमतेम साडेतीन एकर शेती आहे. विशेष म्हणजे इतर शेतकऱ्यांप्रमाणे कपाशी वगैरे पिकांच्या नादी न लागता त्यांनी संपूर्ण क्षेत्रावर फुले सरबती लिंबाची 300 झाडे, कालीपत्ती चिकुची 100, शेवग्याची 2000 आणि कढिपत्त्याची 150 झाडे जगवली आहेत. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेतीतून फळपिकांचे उत्पादन घेत असताना, स्वतःच्या मुलीच्या नावाने लोणच्याचा सृष्टी ब्रॅन्ड त्यांनी नावारूपास आणला आहे.

The farmer brought the ‘Srishti’ brand of pickles in the name of his daughter

सतीश काटे यांना सेंद्रिय शेतीसाठी वाहून घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषिभूषण पुरस्कार देखील मिळाला आहे. फळपिकांची शेती करीत असताना, त्यांनी गेल्या अनेक वर्षात त्यांच्या शेतात रासायनिक खतांचा एक दाणा टाकलेला नाही किंवा किटकनाशकांची फवारणी केलेली नाही. लिंबाच्या लोणच्याची निर्मिती करण्यासाठी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या लिंबाचा प्रामुख्याने वापर ते करतात. वर्षभरात साधारणतः एक ते दीड टनापर्यंत लिंबाचे लोणचे ते तयार करतात. सर्व लोणचे घरगुती पद्धतीने पत्नी ज्योती यांच्या सहकार्याने गावातील महिलांकडून बनवून घेतले जाते. याशिवाय आवळा, हळद, हिरवी मिरची, लिंबू, शेंगदाणा तेल, मोहरी डाळ या साऱ्या सेंद्रिय पदार्थापासून मिक्‍स लोणचे निर्मिती केली जाते. खास बाब म्हणजे काटे परिवाराकडून लोणचे तयार करताना त्यात कोणतेही घातक रसायन वापरले जात नाही.

गुणवत्ता जपण्यावर नेहमीच असतो भर
शेतात उत्पादित झालेल्या सेंद्रिय लिंबुपासून लोणचे तयार करताना, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी आजतागायत गुणवत्तेच कधीच तडजोड केलेली नाही. किंबहुना गुणवत्ता कायम राखण्याकडे त्यांचे सतत काटेकोर लक्ष असते. लोणचे तयार करण्यासाठी शुद्ध शेंगदाणा तेल, मसाला यांचे प्रमाण ठरलेले आहे. लोणचे तयार करण्यासाठी चांगली शुद्धता व स्वच्छतेला खूप महत्व दिले जाते. तयार उत्पादनांची 100 ते 500 ग्रॅम वजनामध्ये प्लास्टिक बरणीत पॅकिंग केली जाते. सेंद्रिय लिंबाचे लोणचे विक्री करताना गुणवत्ता व शुद्धतेची मोहोर म्हणून त्यांनी एफएसएसएआयचे प्रमाणपत्र मिळविले आहे. ट्रेडमार्कची नोंदणीसुद्धा करुन घेतली आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे नाव सृष्टी आहे, तिच्याच नावाने मध आणि लोणच्याचा सृष्टी ब्रॅन्ड सतीश काटे यांनी नावारूपाला आणला आहे.

सेंद्रिय शेतीमुळे वाढला मान सन्मान
साडेतीन एकरातील शेतीत लिंबू, चिकू आणि शेवग्याचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रक्रिया उद्योगाला चालना देणाऱ्या सतीश काटे यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना 2010 मध्ये वसंतराव नाईक सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तत्पूर्वी 2008 मध्ये त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कारसुद्धा मिळाला होता. सेंद्रिय शेतीसोबत त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची विक्री वाढविण्यात यश आल्यानंतर सतीश काटे यांनी चिकूपासून कॅन्डी आणि कढीपत्त्याची चटणी तयार करण्याचा प्रयत्न केला. सतीश काटे यांच्याकडील सेंद्रिय क्रश लिंबू लोणच्याची माहिती मिळाल्यानंतर सुप्रसिद्ध कामत ग्रूपने त्यांच्याकडे लोणचे पुरविण्याची मोठी मागणी सुद्धा नोंदवली होती. सृष्टी ब्रॅन्डच्या नावाखाली विकले जाणारे त्यांचे लोणचे वापरणारे ग्राहकही समाधानी असतात.

संपर्क : सतीश काटे, मो. 9890825032

WhatsApp Group
Previous articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शुक्रवारी जाहीर करणार मोठे पॅकेज ?
Next articleउद्या बुधवारी (ता.13 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव