जळगाव । मालखेडा (ता. चोपडा) येथील लीलाधर पाटील या अपंग तरूणाची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. तो कधीकाळी माल वाहतुकीच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. अवघ्या दीड एकर शेतीवर कुटुंबाचे पोट भरायचे वांदे झाले होते. जवळपास तीन वर्षे त्याने ट्रकवर काम करुन कुटुंबाला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने एक दिवस ट्रक उलटल्यामुळे अपघात झाला आणि लिलाधरच्या डाव्या पायास व डाव्या हातास कायमचे अपंगत्व आले. त्यानंतर शेळीपालन व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय लीलाधरने घेतला.
शेळीपालन व्यवसायाकरीता भांडवल उभे करणे लिलाधरसाठी खुपच आव्हानात्मक काम होते. गोळ्या-बिस्कीट विकून शिल्लक टाकलेले जेमतेम 5 हजार रुपये हातात होते. त्या पैशांतून एक शेळीही विकत घेता येणार नव्हती. त्याबद्दल शेल्टी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील मावसभाऊ उमाकांत पाटील यांच्याकडे लिलाधरने खंत व्यक्त केली. तेव्हा छायाचित्रणाचा व्यवसाय करणाऱ्या उमाकांत यांनी त्यांच्याकडील 10 हजार रुपये लिलाधरला देण्याची तयारी दर्शवली. परंतु, तेवढ्या पैशांवर काम भागणार नव्हते. मंदाणे (ता. शहादा) येथे वास्तव्यास असलेल्या काकांकडूनही त्यामुळे आणखी 30 रुपये उसनवार घेतले. अशा प्रकारे सुमारे 45 हजार रुपयांचे भांडवल जमा झाले. अडचणीतून एकदाचा मार्ग निघाला. स्वतःच्या व नातेवाइकांकडून मिळालेल्या पैशांतून लिलाधरने 7 स्थानिक गावरान शेळ्यांची खरेदी केली. शेळ्या गावालगतच्या जंगलात स्वतः लिलाधर चारण्यासाठी नेऊ लागला.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/Untitled-73.jpg)
अपंग महामंडळाकडून मदतीचा हात…
शेळीपालनाची सुरवात केल्यानंतर जळगाव येथील अपंग वित्त व विकास महामंडळाकडून गरजुंना उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य केले जाते, अशी माहिती मावसभाऊ उमाकांत यांच्याकडून लिलाधरला मिळाली. त्यानुसार महामंडळाच्या कार्यालयात जाऊन कर्ज मिळण्यासाठी लिलाधरने 2013 मध्ये रितसर अर्जही केला. अपंग विकास महामंडळाने उशिरा का होईना लिलाधरला एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कर्जाऊ रकमेतून लिलाधरने सर्वांत आधी नातेवाइकांकडून उसनवार घेतलेले 40 हजार रुपये फेडले. उरलेल्या पैशांतून पुन्हा चार शेळ्या खरेदी केल्या. त्याशिवाय शेळ्यांसाठी घरालगत निवाराशेड उभारले. तारेच्या जाळीचे कंपाऊंड तयार करुन चाऱयाची सोय केली. उत्तम पैदास तंत्राचा अवलंब केल्यामुळे आजच्या घडीला लिलाधरच्या गोठ्यात लहान व मोठ्या शेळ्यांची संख्या 40 पर्यंत आहे.
करडांच्या जोमदार वाढीवर भर…
जिल्हा उद्योग केंद्रातील शेळीपालनाशी संबंधित 30 दिवसांचे प्रशिक्षणही लिलाधरने घेतले आहे. त्यातून शेळ्यांना विविध ऋतुत होणारे आजार तसेच रोग प्रतिबंधांत्मक लसीकरणाची माहिती मिळाल्याने लिलाधरने करडांची मरतुक जवळपास कमी केलेली आहे. पैदाशीसाठी गोठ्यातच स्थानिक आफ्रिकन बोअर जातीचा बोकडसुद्धा सांभाळला आहे. त्यामुळे शेळ्यांमधील वंश सुधार शक्य झाला असून, गोठ्यात जातिवंत करडांची पैदास वाढलेली आहे. शेळीपालनातील जोखीम कमी करण्यासाठी शेळ्यांचा विमा काढलेला आहे. वेळोवेळी शेळ्यांवरील आजाराची लक्षणे अोळखून तातडीने उपचार करुन घेतले जातात. दिवसभर शेळ्या चरण्यासाठी बाहेर सोडल्या जातात. तत्पूर्वी सकाळी शेळ्यांना तुर व भुईमुगाचा वाळलेला पाला खाण्यास देतात. याशिवाय पोषक खाद्य म्हणून ज्वारी, गहु व मका यांचा भरडा खाऊ घालतात. खाद्यात मीठ आवर्जून मिसळले जाते. जेणेकरुन शेळ्या पाणी चांगल्याप्रकारे पितात.
तंत्रशुद्ध पद्धतीने संगोपन केल्यामुळे त्याच्या गोठ्यातील शेळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आत्तापर्यंत बरेच नर करडे व शेळ्या विकल्या आहेत. त्यामुळे काही लाख रुपयांची आर्थिक कमाईसुद्धा झालेली आहे. कमाईच्या पैशांतून लिलाधरने अपंग महामंडळाचे कर्ज फेडले असून, चांगले दुमजली घर बांधण्याचे स्वप्नही पूर्ण केले आहे. लेंडीखताचा शेतात वापर करुन दीड एकर शेतीत केळी, काकडी, मिरचीचे पीक पाटील कुटुंब घेऊ लागले आहे. लिलाधरचे दोन्ही लहान भाऊ ट्रॅक्टर तसेच प्रवाशी वाहतूक करणारी गाडी चालवून लिलाधरच्या खांद्याला खांदा आता लावत आहे.
संपर्क ः लिलाधर पाटील 9765901080
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)