जळगाव । गावशिवार न्यूज । यशोगाथा या सदरात मंगरूळ (ता.चोपडा) येथील कांतिलाल भोमराज पाटील या उच्चशिक्षित तरुणाने विकसित केलेल्या ‘इकोपेस्ट ट्रॅप’ची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना उपयुक्त असलेला प्रयोग यशस्वी ठरल्याने त्यांना खेडेगावात रोजगाराचे चांगले साधन सुद्धा उपलब्ध झाले आहे.
कांतिलाल पाटील यांची यशोगाथा खूप भन्नाट आहे. त्यांचे शिक्षण बीएस्सी (कृषी) पर्यंत झालेले आहे. एकत्रित कुटुंबाच्या 17 एकर शेतीत कापूस, गहू, केळी, मका, कलिंगड यासारखी बरीच पिके ते घेतात. सन 2015 मध्ये त्यांच्या शेतात कीड व रोगामुळे कलिंगडाचे पीक पूर्णतः वाया गेल्यानंतर त्यांनी कीड नियंत्रणाच्या दृष्टीने विविध प्रयोगांवर भर दिला. त्याच प्रयत्नातून इकोपेस्ट ट्रॅपची संकल्पना आकारास आली. अतिशय कमी खर्चात तयार होणाऱ्या या ट्रॅपमध्ये ०.5 वॅटचा बारीक एलईडी दिवा बसवलेला आहे, जो सायंकाळी अंधार पडल्यावर आपोआप प्रज्वलित होतो. सकाळी सूर्य उजाडल्यावर आपोआप बंदही पडतो. त्यासाठी दिव्याला सेन्सर जोडलेला आहे. निशाचर वर्गातील प्रौढ कीटक रात्री समागमासाठी बाहेर पडल्यानंतर दिव्याचा प्रकाश पाहून इकोपेस्ट ट्रॅपकडे बरोबर आकर्षित होतात. किडींच्या या सवयीचा कीड नियंत्रणात कांतिलाल पाटील यांनी चांगला उपयोग करून घेतला आहे.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/Untitled-70.jpg)
फक्त 200 रूपयात मिळतो इकोपेस्ट ट्रॅप
इकोपेस्ट ट्रॅप तंत्रामध्ये नर आणि मादी दोन्हीही आकर्षित होत असल्याने किडींचे चांगल्या प्रकारे नियंत्रण शक्य होते. एका ट्रॅपसाठी शेतकऱ्यास साधारणतः २०० रुपयांपर्यंत खर्च येतो. विशेष म्हणजे पिकामध्ये प्रकाशमान झालेला ट्रॅप (सापळा) पाहून रानडुकरांसारखे प्राणी तिकडे फिरकत नाहीत. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने त्याचा शेतीच्या उत्पादनावर सकारात्मक परिणामही झाला. कांतिलाल पाटील यांनी तयार केलेल्या इकोपेस्ट ट्रॅपचा स्वतःच्या शेतावरील कपाशी पिकात सुरुवातीला वापर केला होता. त्याचे चांगले परिणाम त्यांना दिसून आले. प्रतिकूल हवामानामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन घटलेले असताना, कांतिलाल पाटील यांना एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन सहजपणे मिळाले. त्यानंतर त्यांनी ट्रॅपचा जास्तीतजास्त प्रचार व प्रसार करण्यावर सातत्याने भर दिला. ‘इकोपेस्ट ट्रॅप’ला पेटंट मिळावे म्हणून पाटील यांचे प्रयत्न सुरु होते. त्यातही त्यांना यश मिळाले आहे. आत्मा तसेच कृषी विभागाकडुनही त्यांना इकोपेस्ट ट्रॅपचा प्रसार करण्यासाठी शक्य ती मदत व प्रोत्साहन देण्यात येत आहे. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या ट्रॅपला पसंती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांना किडींपासून कमी खर्चात मुक्तता मिळाल्याने शेती उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)