महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात कशी काय मिळते स्वस्त साखर ?

गावशिवार न्यूज | दिवाळीनंतर सण आणि उत्सवांचे दिवस संपल्याने राज्यातील साखरेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यात अपेक्षित ग्राहकी नसल्याने साखरेचे दर 50 ते 100 रूपयांनी कमी झाले आहेत. दुसरीकडे लगतच्या कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा स्वस्त साखर मिळू लागल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. (Sugar industry)

उसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र सरकारने मर्यादा घातल्यानंतर देशातील संभाव्य साखर टंचाई आता कमी झाली आहे. बाजारात मुबलक प्रमाणात साखरेचा साठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत दरवाढीची शक्यताही कमी झाली आहे. दुसरीकडे विदेशात होणारी साखर निर्यात देखील ठप्पच आहे. याचा मोठा परिणाम साखरेच्या विक्रीवर झाला असून, खरेदी कमी झाल्यानंतर साखरेच्या दरात अलिकडे कोणतीच लक्षणीय वाढ झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्राच्या निर्णयाचा साखर कारखान्यांना फटका

देशांतर्गत साखरेचा साठा मुबलक प्रमाणात राहावा म्हणून केंद्र सरकार सातत्याने ग्राहक हिताचे निर्णय घेताना दिसत आहे. त्यासाठी केंद्राने साखरेचा विक्री कोटा देखील वाढवून दिला आहे. परिणामी, बाजारात साखरेची मोठी आवक होत असून, पुढील काही दिवस बाजारातील साखरेची आवक घटण्याची कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत. साहजिक व्यापाऱ्यांचा गरजेनुसारच साखरेची खरेदी करण्याकडे आता कल वाढला असून, त्याचा मोठा परिणाम साखरेच्या खरेदी व विक्रीतून होणाऱ्या उलाढालीवर झालेला आहे. साखरेची विक्री मंदावल्याने राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांचा त्याचा मोठा फटका बसला आहे.

WhatsApp Group
Previous articleशासन द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी वाईन उद्योग प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविणार
Next articleराज्यात सर्वदूर पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती