एकरी 150 टन ऊस उत्पादन घेणारी महिला ऊसभूषण पुरस्काराची मानकरी

गावशिवार न्यूज | वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुमारे 150 टन उत्पादन घेऊन अव्वल ठरलेल्या शेतकरी महिलेला यंदाचा कै. यशवंतराव चव्हाण ऊसभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मजरेवाडी (ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) येथील विमल चौगुले असे त्यांचे नाव आहे. विशेष म्हणजे चौगुले यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून जास्तीतजास्त सेंद्रिय खतांवर उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखवले आहे. (Sugarcane Farmer)

विमल चौगुले यांच्याकडे गायींचा गोठा देखील आहे, त्यामुळे त्यांना वर्षभरात बरेच शेणखत मिळते. ज्याचा वापर करून त्यांना आपल्या शेतीत उसाचे भरघोस उत्पादन घेणे शक्य झाले आहे. याशिवाय शेतीत पालापाचोळा, शेतातील पिकांचे शिल्लक अवशेष कुजविण्यावर त्यांचा विशेष भर असतो. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर केल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झालेल्या असताना, विमलताई चौगुले ह्या कधीच अंदाजे रासायनिक खतांचा वापर करत नाही. माती परीक्षण करून घेतल्यानंतर जमिनीत ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, तीच खते त्या शेतात टाकतात. उसाला पाणी देण्यासाठी पाटपाणी पद्धतीचा वापर कधीच करत नसल्याने त्यांच्या शेतात कायम वाफसा स्थिती असते. पाण्याचा काटसकसरीने वापर करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन यंत्रणा बसवून घेतली आहे. एकाच शेतात वारंवार तेच ते पीक न घेता पिकांची फेरपालट करण्यावर देखील त्यांचा नेहमीच भर असतो.

मेहनतीमुळे पुरस्कारापर्यंत पोहोचता आले
विमलताई चौगुले उसासोबत केळी आणि मिरचीची लागवड अधुनमधून करतात. जेणेकरून बेवड बदल होऊन जमिन भुसभुशीत राहण्यास चांगली मदत होते. उसाचे एकरी 150 टन उत्पादन घेण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत खरोखर पुरस्कारास पात्र अशी आहे. एक महिला असून त्यांनी ऊस शेतीत दैदिप्यमान यश संपादन करून महिला देखील पुरुषांपेक्षा कमी नसतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी पोपट महाबरे (जुन्नर) आणि अनिकेत बावकर (मुळशी) यांनाही राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

WhatsApp Group
Previous articleराज्यात किमान तापमानात घट होण्यासाठी आवश्यक पोषक वातावरणाची निर्मिती
Next articleरविवारी (14 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव