Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही शनिवारी (ता.06) आणि रविवारी (ता.07) पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसात आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वदूर ढगाळ वातावरण तयार झाल्याने रात्रीच्या किमान तापमानात सहा ते आठ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. दिवसाच्या कमाल तापमानात मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. अशा या परिस्थितीत पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर खान्देशातील नंदुरबार, धुळे जिल्ह्यात त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीच्या भागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. सध्याचे पावसाळी वातावरण निवळल्यानंतर राज्यातील किमान तापमानात घट होऊन पुन्हा जोरदार थंडीचे पुनरागमन होईल, असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तोपर्यंत कमाल व किमान तापमानात मोठे चढउतार अनुभवण्यास मिळणार आहेत.