Weather Update : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी (ता.02) तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली असली तरी, बहुतांश जिल्ह्यात आता आकाश निरभ्र होऊन अवकाळी पावसाचे वातावरण निवळले आहे. हवामान विभागानेही काही दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस थांबल्यानंतर सर्वदूर आता दाट धुके पसरू लागले आहे. सकाळच्या प्रहरी पिकांवर दवबिंदू सुद्धा जमा होताना दिसत आहेत.
Finally, the force of unseasonal rain has reduced in the state
दरम्यान, अरबी समुद्रासोबत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा थोडापार परिणाम अद्याप महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर जाणवत आहे. रविवारी (ता.3) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र मजबूत होऊन राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता त्यामुळे वर्तविण्यात आली आहे. हमून चक्रीवादळानंतर ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे राज्यात पुढील दोन दिवसात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होण्याची चिन्हे आहेत. मात्र, राज्यातील उर्वरित भागातील वातावरण हे कोरडेच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता तरी पावसाने थांबावे, अशी प्रार्थना त्यामुळे शेतकरी वर्ग आभाळाकडे पाहून करताना दिसत आहे.
शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या पंचनाम्यांची लागली आहे प्रतिक्षा
अवकाळी पाऊस तसेच गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे अतोनात नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी व महसूल यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात संबंधित सर्व यंत्रणा अजुनही शेतांच्या बांधावर पोहोचलेली नाही. वेळेवर पंचनामे पूर्ण न झाल्यास आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, अशी भीती त्यामुळे संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटते आहे. दुसरीकडे प्रत्येक पालकमंत्री पीक नुकसानीची जातीने पाहणी करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यांचे फारच थोडे पालकमंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आले आहेत.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)