Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासात पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील विदर्भात तसेच आंध्रप्रदेश व तमिळनाडूत त्यामुळे ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे.
Cyclone Michoung predicts heavy rains in next 24 hours
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र दाबाच्या पट्ट्यात आता रूपांतर झाले आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूत मंगळवारी (ता.5) आणि बुधवारी (ता.6) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे आधीच शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरण कोरडे झाल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास देखील सोडला होता. मात्र, आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने तयार झालेले मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी (ता.5) दुपारी आंध्रप्रदेशातील नेलोर आणि मच्छलीपट्टनम भागातील किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विशेषकरून विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मिचौंग चक्रीवादळ किनाऱ्यालगत आल्यानंतर ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागतील. मुसळधार पावसाला सुरूवात होऊन समुद्रात एक ते दीड मीटर उंचीच्या लाटा त्यामुळे उसळतील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)