Whether Update : भर हिवाळ्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपिटीमुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला हंगाम वाया गेला असून, त्याठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, आज मंगळवारी (ता.28) पुन्हा राज्यातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Rain warning with stormy winds again in the state today
अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे व गारपिटीचा महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यांना फटका बसला आहे. खरिपातील काढणीवर आलेला मका तसेच कापसासह कांदा, तूर आणि रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांचे, त्याचप्रमाणे केळी, द्राक्ष, हापूस आंबा, मोसंबी, पपई, चिकू, पेरू, बोरे यासारख्या फळबागांचे भरून न निघणारे नुकसान अवकाळी पावसात झाले आहे. संबंधित सर्व शेतकरी अचानक उद्भवलेल्या अस्मानी संकटामुळे पार खचून गेलेले असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना तातडीने शेतांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरूच असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यास शासन यंत्रणेला अडचण येत आहे. तोपर्यंत कृषी विभागाच्या मदतीने गावपातळीवर सर्वेक्षण विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीक नुकसानीचे प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केले आहेत. त्यानुसार राज्यभरात सुमारे 50 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यात 890 गावांमधील 32 हजार 833 हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शासकीय यंत्रणेला तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातही 13 हजार हेक्टरवरील पिकांचे तसेच नगर जिल्ह्यात 8500 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
आज या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
सोमवारनंतर राज्यातील वादळी वाऱ्यासह पावसाला फार जोर राहिलेला नाही. तरीही मंगळवार (ता.28) साठी राज्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आदी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. संबंधित सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र ढगाळ हवामान राहून तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)