महिला शेतकऱ्यांना केंद्र सरकार देऊ शकते लवकरच मोठे गिफ्ट

Women farmers : लोकसभेची आगामी निवडणूक घोषित होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातील महिलांना मोठे गिफ्ट देण्याच्या विचारात आहे. प्राप्त माहितीनुसार फेब्रुवारीत सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी काही चांगल्या घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची रक्कम खासकरून महिला शेतकऱ्यांसाठी तब्बल 12 हजार रूपयांपर्यंत वाढविली जाऊ शकते.

देशात सद्यःस्थितीत नावावर सातबारा उतारा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे 26 कोटी इतकी असून, त्यात फक्त 13 टक्के म्हणजे 3 कोटी 38 लाख महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित सर्व महिलांचे कल्याण साधण्यासाठी केंद्र सरकार आता अनेक योजना आणण्याचा विचार करीत आहे. त्याअंतर्गतच महिलांसाठी खास कॅश ट्रान्सफर योजना सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतही यापुढे महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या वर्षभरात सुमारे 6 हजार रूपयांचा लाभ दिला जातो. मात्र, शेती नावावर असणाऱ्या महिलांना यापुढे पीएम किसान योजनेमधून वार्षिक 12 हजार रूपये देण्याची हालचाल केंद्राकडून केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पीएम किसान योजनेतून महिला शेतकऱ्यांना दुपटीने लाभ दिल्यास केंद्राच्या तिजोरीवर सुमारे 120 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडू शकतो. मात्र, महिला शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी अतिरिक्त भार पेलण्याची तयारी देखील केंद्राने चालविली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत घोषित केलेल्या बऱ्याच योजनांमध्ये महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. महिलांना समोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे एकूण बजेट त्यामुळे 2.33 लाख कोटी रूपयांपर्यंत गेले आहे.

WhatsApp Group
Previous articleBanana Market Rate : बुधवारी (10 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleमध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज बुधवारी तुरळक पावसाची शक्यता