गावशिवार न्यूज | देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झालेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या खास भरिताच्या वांग्यांपासून तयार झालेले स्वादिष्ट भरीत आणि भाकरीने पहिल्याच दिवशी डंका वाजवला. महोत्सवाला भेट देणाऱ्यांनी भरीत व भाकरीचा आस्वाद घेत तृप्तीचा ढेकर दिला. (Youth Festival)
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस दरवर्षी 12 जानेवारीला साजरा करण्यात येतो आणि त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. देशातील कोणत्याही एका राज्यातील विशिष्ठ शहराची युवा महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी निवड केंद्राकडून करण्यात येते. त्या माध्यमातून परंपरा व संस्कृतीचे जतन करण्यासह राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यावर भर दिला जातो. त्यानुसार यंदा सुमारे 15 वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्राला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. नाशिक शहरातील यंदाच्या या युवा महोत्सवात देशातील 28 राज्ये, आठ केंद्र शासित प्रदेशांचा समावेश असताना, जळगाव जिल्ह्यासही त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभाग तसेच राज्य शासनातर्फे नाशिक येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते तपोवन मैदानावर झाले आहे.
जळगावच्या जीआय नामांकन प्राप्त भरीत वांग्यांचा स्टॉल ठरला लक्षवेधी
नाशिकच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथील नवनिर्मिती शेतकरी मंडळाने लावलेला भरीत वांग्याचा स्टॉल विशेष लक्षवेधी ठरला आहे. मंडळाचे अध्यक्ष किशोर चौधरी तसेच त्यांचे सहकारी मित्र परेश लोखंडे, योगेश झांबरे, आत्माचे प्रतिनिधी सोनू कापसे यांच्या प्रयत्नांनी जीआय मानांकन प्राप्त वांग्यांचे भरीत आणि सोबतीला असलेली रूचकर भाकर यांचा आस्वाद राज्यभरातील खवय्यांना त्याठिकाणी घेता आला आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, नाशिकचे जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांनी स्टॉलला भेट दिली. सोबत भरीत भाकरीचा आस्वाद घेऊन प्रशंसा देखील केली. यावेळी जळगाव आत्माचे प्रकल्प संचालक श्री.चलवदे, श्रीकांत झांबरे, श्री.साळवे आदी उपस्थित होते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)